शिक्षणाचा ध्यास घेतलेली गोपाळवाडी – सत्तार शेख – Maharashtra Times- Apr 22, 2017

पुण्याहून गोपाळवाडीस जाण्यास निघालो नगर जिल्ह्याची हद्द सुरू झाल्यावर रस्त्याची अवस्था अतिशय वाईट. गोपाळवाडी फाट्याहून गोपाळवाडीकडे जात असताना आपण इतक्या दुर्गम भागात आलोत? हाच प्रश्न सतावत होता. आजुबाजूला छोटछोट्या डोंगराच्या पायथ्यापासून आमची रस्ता विचारत विचारत आगेकूच सुरू होती. गोपाळवाडीच्या अगदी जवळ आलो होतो तोच दिसलेले दृश्य मनात धडकी भरवत होते. घोडनदीच्या पात्रात वाळूतस्करांच्या अनेक गाड्या उभ्या होत्या. अनेक बोटींद्वारे वाळू उपसली जात होती. नदीपात्रातील हालचाली भयावह वाटत होत्या. तर दुसरीकडे वीटभट्यांची मोठी संख्या दिसत होती. गोपाळवाडीत प्रवेश करताना मनात विचार आला की आपण एका विलक्षण दुनियेत आलो. दहशतीखालील वातावरणाचा गंध एव्हाना आम्हाला आला होता. मातीच्या रस्त्याने अखेर गोपाळवाडीच्या शाळेत पोहचलो.

नगर जिल्ह्यातील गोपाळवाडी (ता. श्रीगोंदा) साधारणत: ३०० ते ४०० लोकसंख्येचे छोटसे गाव. या गावातील लोकांचा शेती, वीटभट्टी, वाळू उपसा व मजुरी मासेमारी हे व्यवसाय. भटक्या जमातीतील गोपाळ समाजाची ही वस्ती. या वस्तीत ठिकठिकाणी मोठ मोठ्या वीटभट्ट्या, छपरांची मोडकळीस आलेली घरं. पत्र्याची घरे तर मोजकीचे पक्क्या छोट्या इमारती. गोपाळवाडीसाठी सरकारने पहिली ते चौथीपर्यंत शाळा सुरू केली आहे. भटक्या समाजातील मुले नियमित शाळेत येत आहेत. आपली मुले शिकावीत यासाठी येथील गावकरी लक्ष देऊन असल्याचे निदर्शनास आले. गोपाळवाडी शाळेत एकूण २७ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. यात मुलींची संख्या लक्षणीय. आम्ही ज्या दिवशी गेलो होतो त्या दिवशी ९ मुले व १२ मुली शाळेत उपस्थित होते. भटक्या समाजातील मुलांमधील गुणवत्तेला वाव मिळावा यासाठी या शाळेतील प्रयोगशील शिक्षिका शोभा कोकाटे जोमाने काम करत आहेत. या कामात मुख्याध्यापक ठुबे हेही त्यांना मदत करत आहेत. कोकाटे व ठुबे या दोन शिक्षकांनी गोपाळवाडी शाळेतील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी लोकसहभागातून शाळा डिजिटल केली आहे. तसेच वर्गाच्या भिंती बोलक्या केल्या आहेत. दरम्यान शाळेतील विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी यासाठी शाळेत सुसज्ज ग्रंथालय असावे यासाठी प्रयत्नशील असलेल्या कोकाटे यांनी सोशल मिडीयाच्या माध्यमांतून कस्तुररत्न फाऊंडेशनचे अध्यक्ष किर्ती ओसवाल यांच्याकडे पुस्तकांची मागणी नोंदवली होती. गोरगरिब, दिन दलित, आर्थिकदृष्ट्या दुर्बल व उपेक्षित समाज घटकातील मुले कौटुंबिक परिस्थितीमुळे शिक्षणापासून वंचित राहू नये तसेच उपेक्षितांना दर्जेदार गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे यासाठी कृतीशीलपणे काम करणाऱ्या कीर्ती ओसवाल यांनी तातडीने पुस्तकांची मागणी मान्य करत ग्रंथालयास पुस्तके देण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसारच आम्ही गोपाळवाडी शाळेत दाखल झालो होतो.

तब्बल एक तास मुलांबरोबर झालेल्या संवादातून कोकाटे व ठुबे या दोन शिक्षकांनी मुलांच्या गुणवत्तेवर केलेले काम पदोपदी जाणवत होते. आमच्या कुठल्याही प्रश्नांना बेधडकपणे मुले-मुली उत्तर देत होती. कुणाला डॉक्टर,पोलिस,शिक्षिका, इंजिनीअर तर कुणाला देशसेवेसाठी सैन्यात जायचयं. अल्पवयात या चिमुकल्यांनी पाहिलेल्या स्वप्नांना घडवण्यासाठी कोकाटे व ठुबे मुलांना सर्जनशील ज्ञानाचा खजिना देऊन त्यांच्या स्वप्नांना फुलवत आहेत.

पहिली ते चौथीपर्यंत शिक्षण पूर्ण झाल्यानंतर येथील विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी दाणेवाडीला जावे लागते. गोपाळवाडी ते दाणेवाडी हे चार किलोमीटर अंतर विद्यार्थ्यांना पायी जावे लागते. आठवी नंतर शिक्षणासाठी पुन्हा गोलेगावला जावे लागते. हे आठ किलोमीटरचे अंतर येथील मुलांना पायीच पार करावे लागते. गोलेगाव ते गोपाळवाडी अंतर जास्त असल्यामुळे अनेक पालक मुलींना पुढील शिक्षणासाठी पाठवत नाहीत. यामुळे आठवीनंतर शिक्षणात मुलींच्या गळतीचे प्रमाण मोठे आहे. गोपाळवाडी शेजारी आणखी दोन वाड्या आहेत. तेथील मुलांचीही अशीच स्थिती. नगर-पुणे महामार्गापासून अवघ्या १२ ते १५ किलोमीटर अंतरावरील गावांची अशी वाईट स्थिती असेल तर मग कधी येणार उपेक्षितांची मुले शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात? हा प्रश्न मात्र सतावू लागतो. गोपाळवाडी, दाणेवाडीसह या भागातील नागरिकांचे सर्व व्यवहार पुणे जिल्ह्यात होतात मात्र प्रशासकीय कामकाजासाठी येथील नागरिक, विद्यार्थी व इतर घटकांना ६५ किलोमीटर अंतर पार करत श्रीगोंदा या तालुक्याच्या ठिकाणी जावे लागते.

गोपाळवाडी व दाणेवाडी या दोन शाळांचे नुकतेच संयुक्त स्नेहसंमेलन पार पडले. यातून दोन्ही शाळांना सुमारे दीड लाखाचा निधी जमा झाला. जमलेल्या निधीतून शाळेसाठी आवश्यक भौतिक सुविधा राबवल्या जाणार असल्याचे शोभा कोकाटे यांनी सांगितले. दरम्यान बोअरवेलवर वीजपंप बसवल्यास झाडांना व मुलांना पाणी देणे सोपे होईल. वीजपंप तातडीने बसवून देण्याचे आश्वासन कीर्ती ओसवाल यांनी दिले. पुढील शैक्षणिक वर्षापासून येथील शाळेची मॉडेल स्कूल म्हणून नवी ओळख होईल त्यादृष्टीने शिक्षक प्रयत्नशील आहेत.

गोपाळवाडी व दाणेवाडी या दोन शाळांचे नुकतेच संयुक्त स्नेहसंमेलन पार पडले. यातून दोन्ही शाळांना सुमारे दीड लाखाचा निधी जमा झाला. जमलेल्या निधीतून शाळेसाठी आवश्यक भौतिक सुविधा राबवल्या जाणार असल्याचे शोभा कोकाटे यांनी सांगितले. दरम्यान बोअरवेलवर वीजपंप बसवल्यास झाडांना व मुलांना पाणी देणे सोपे होईल. वीजपंप तातडीने बसवून देण्याचे आश्वासन कीर्ती ओसवाल यांनी दिले. पुढील शैक्षणिक वर्षापासून येथील शाळेची मॉडेल स्कूल म्हणून नवी ओळख होईल त्यादृष्टीने शिक्षक प्रयत्नशील आहेत.