Teacher’s Feedback – Video Conference with ZP Schools

Umesh Pawar Ajnuj(Srigonda) – Mr. Sandeep Khade

श्रीगोंदा तालुक्यातील पवारवाडी( अजनुज) या शाळे सोबत श्री.उमेश पवार सर यांनी vc द्वारे संपर्क साधला.४९ मिनिटे चाललेल्या या संभाषणात पवार सरांनी खूप मोलाची माहिती दिली.

हसत व साधेपणाने सर्व विषयांना त्यांनी हात घातला. त्यांच्या संभाषण कौशल्यामुळे मुले सुद्धा खूप मोकळ्यापणे त्यांच्या बरोबर बोलली. शैक्षणिक विषयापासून अमेरिकेतील हवामान आणि कृषी इथपर्यंत विषय रंगला.तिकडची शिस्त ,मोकळे पण याची चुणूक मुलांना जाणवली. पवार सरांनी त्यांच्या जीवन प्रवासातील काही वर्णन मुलांना सांगितले.

जर आपल्या पंखात बळ असेल तर उलट वाऱ्यात सुद्धा उडता येतं, हा आत्मविश्वास शाळेतल्या मुलांना मिळाला.

 

व्हिडिओ कॉन्फरेन्सचे (vc) नाव ऐकून असेंकी वाडीवरची पालक मंडळी सुद्धा जमली होती. आपल्याला मुलांना प्रोत्साहन देण्यासाठी अमेरिकेतून काय सांगणार यातून कुतूहल तर होतेच. त्यांनी सुद्धा चलन, कुटूंब व्यवस्था , नोकरीचे स्वरूप अश्या विषयावर गप्पा मारल्या.

आपली ही मुले अशी कर्तृत्ववाण व्हावी असे नक्की त्यांनी मनाशी ठरवले.महिलांचा सुद्धा सहभाग या vc मध्ये होता, तेथील शिक्षण पद्धती, महिलांचे जीवन या विषयी त्यांनी जाणून घेतले.

आपल्या जिल्ह्यासाठी काहीतरी करण्याची त्यांची तळमळ या सर्व गोष्टीतून जाणवत होती.

त्यांनी नगरला आल्यावर पवारवाडी शाळेला भेट देण्याचे बोलून दाखवले.

तुमच्या बोलण्याने इतकी प्रेरणा मिळाली तर तुम्ही भेट दिल्यावर दिसणारे चित्र नक्कीच खूप आशादायी असणार आहे .

तुमच्या बरोबर बोलून खूप प्रेरणा आणि आनंद मिळाला, तो तुम्ही बिंदीकत दिला त्याबद्दल श्री.उमेश पवार सरांचे मी आभार मानतो.

तसेच आमच्या शाळेला या vc ची संधी दिल्याबद्दल श्री.राजेंद्र जगताप, सय्यद साहेब, बोरुडे साहेब व हकीम साहेब तुमचेही आभार मानतो.

यातून नक्कीच काही उत्तुंग घडेल अशी मनोमन प्रार्थना करतो.

ग्लोबलनगरी ग्रुप, तुमच्या जन्मभूमी प्रति असलेल्या प्रेमाला माझा शतशः प्रणाम!!

- श्री.संदीप खाडे,

पवारवाडी शाळा, श्रीगोंदा

Kishore Gore (Jamkhed )- Mr. Ravi Bhapkar

आज ग्लोबल नगरी या उपक्रमांतर्गत मुळचे नगर जिल्ह्यातील रहीवाशी व सध्या जगातील विविध देशांमधे स्थायिक असलेले यशस्वी डॉक्टर , उद्योजक , संशोधक यांच्याशी ग्लोबल नगरी परिवार USA व जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री रविंद्र बिनवडे साहेब यांच्या संकल्पनेतून आज शाळेच्या पहिल्याच दिवशी जिल्ह्यातील 30 शाळांचा skype तंत्रज्ञानाचा वापर करून प्रत्यक्ष विडियो कॉन्फरन्स द्वारा संवाद साधन्यात आला.

   यावेळी आपापल्या क्षेत्रात नामवंत असलेल्या व विदेशात राहणाऱ्या सर्व नगर करांनी विद्यार्थी व SMC सदस्य तसेच जिल्हा परिषद पदाधिकारी यांचेशी skype द्वारा संवाद साधला. विद्यार्थ्यांनी विचारलेल्या अनेक प्रश्नांची त्यांनी समर्पक अशी उत्तरे दिली . तसेच आयुष्यात यशस्वी व्हायचे असेल काय करायला हवे याचा कानमंत्र दिला.

     भविष्यात विद्यार्थ्यांसाठी काही योजना आखण्याचा विचारही त्यांनी बोलून दाखवला तसेच पुढील भारत भेटित शाळेवर येवून प्रत्यक्ष विद्यार्थी भेट घेण्याचे नक्की केले. त्यांच्याशी झालेल्या संवादानंतर विद्यार्थी खुपच खुशीत दिसत होते. बऱ्याच NRI नगरकरांनी विद्यार्थ्यांना विविध वीडियो / ऑडियो क्लिप द्वारा तिकडिल शिक्षण पद्धति तसेच इतर बाबिंविषयक माहिती दिली. खरोखरच समाजाचे उत्तरदायित्व फेडण्यासाठी एकत्र आलेल्या नगरी NRI चे कौतुक वाटले.

       अशा प्रकारचा प्रेरणादायी उपक्रम आयोजित करून विद्यार्थ्यांना नविन्यपूर्ण शैक्षणिक अनुभव दिल्याबद्दल अहमदनगर जि.प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री रविंद्र बिनवडे साहेब, ग्लोबल नगरी चे अमेरिकेतील संयोजक श्री किशोरजी गोरे, शिक्षणाधिकारी श्री अशोक कडूस साहेब , उपशिक्षणाधिकारी पोपटराव काळे साहेब यांचे खुप खुप आभार.

        तसेच आदरणीय मुख्य कार्यकारी अधिकारी श्री रविंद्र बिनवडे साहेब यांच्या प्रेरणादायी संकल्पनेला प्रतिसाद देवून गेले पाच दिवस  सतत संपर्कात राहून,   हा उपक्रम यशस्वी करणाऱ्या  शिक्षक बांधवांचे ही खुप खुप अभिनंदन.

    भविष्यात असेच नाविन्यपूर्ण प्रकल्प राबविन्याचा संकल्प करुया... !!

Pramod Karle Ghumari – Mr. Babasaheb Pawar

आज सकाळी ठीक पावणे अकरा वाजता मा. प्रमोद कार्ले (अमेरिका) यांच्याशी झालेला संवाद खूप ऊर्जा देऊन गेला. जिओ च्या कनेक्टिव्हिटी मुळे अतिशय छान संभाषण झाले. लॅपटॉपवर झालेले संभाषण एलसीडी प्रोजेक्टरवर प्रक्षेपित केल्यामुळे सर्वांना ते छान पाहता आले व साउंड सिस्टिममुळे आवाज व्यवस्थित सर्वांपर्यंत पोहचला. महत्वाचे होते की या स्वागत समारंभासाठी व आपल्याच परदेशी नागरकराला ऐकण्यासाठी सरपंच, व्यवस्थापन अध्यक्षांसाह 14 जाणकार ग्रामस्थ उपस्थित होते. कनेक्टिव्हिटी च्या दोन ट्रायलमुळे आत्मविश्वास होताच. विद्यार्थी नावागतांचे स्वागत होताच सर्वांचे लक्ष होते ते अमेरिकन मराठी माणसाशी बोलण्याकडे! कोण असेल? काय बोलेल? मराठी बोलेल काय? का बोलणार? आम्ही त्यांच्याशी बोलू शकू काय? 🙁 या सर्व प्रश्नांसह निवडक 50 विद्यार्थी, आठ शिक्षक व 14 ग्रामस्थ यांच्या साक्षीने व्हिडीओ कॉल सुरू झाला आणि कार्ले सरांच्या पहिल्याच स्माईलने सर्व उपस्थितांचे चेहरे खुलले.😊

सरांनी प्राथमिक ओळख व स्वागत झाल्यानंतर निवेदनाला सुरुवात केली. प्रथम 10 ते 15 मिनिटे संदेश देतो आसे सांगून सुरुवात केली आणि एवढी अस्खलित मराठी ऐकून सर्व लोक भारावले. संदेशातील बारकावे अतिशय तपशिलाने मांडत असताना, अमेरिकन संस्कृती, लोकजीवन, व्यवस्थापन, प्रशासन, शिस्त, स्वछता, व्यक्तिमत्वाचे पैलू, शिक्षणाचा अर्थ, प्राथमिक शिक्षणाचे माध्यम,  मराठी शी असणारी नाळ, जगातील मराठी माणसासाठी असनाऱ्या संधी या सर्व विषयांना खूप सुंदर स्पर्श करत निवेदन अर्धा तास झाले तरी वेळ कोणाच्याही लक्षात आली नाही.

मग सुरुवात झाली ती संभाषण (प्रश्न उत्तरे)  जणीवपूर्वकच पूर्वनियोजित नसल्यामुळे ऐनवेळी बोलणाऱ्याला संधी द्यायचे ठरल्यानुसार पहिली बाजी सुमन या मुलीने मारली आणि सरांनी तिच्याशी खूप आपुलकीने गप्पा मारल्या. आता मात्र माझा नंबर येतो काय? काय बोलू यामुळे मुले कुतूहल मिश्रित बावरली. मध्येच सरपंच यांना ना राहवून बोलण्याची इच्छा व्यक्त केली व भेटण्यास गावी येण्याचे निमंत्रण दिले. जणू आपला खूप जुना नातेवाईक सखा बोलतोय इतकी आत्मीयता केवळ पाऊण तासात निर्माण झाली. सरांनी पुढील वर्षी येण्याचे आश्वासन दिले आणि व्यवस्थापन अध्यक्ष यांनी शाळेचे, उपक्रम, केलेली प्रगती, विद्यार्थी उपक्रम यांची माहिती दिली. शाळेचे काम पाहून कार्ले सर खूप समाधानी झाले व ग्रामस्थांचे आभार मानले. दरम्यान बोराडे नावाच्या मुलीने पुन्हा बोलण्याची इच्छा व्यक्त केल्याने खूप साध्य भाषेत सरांना कशे आहात? कधी याला? तिकडे कसे वातावरण आहे ? असे सहज सुंदर प्रश्न विचारले आणि सरांनी चक्क या प्रश्नाचा आधार घेऊन खूप छान संदेश दिले. तब्बल एक तास होऊन गेला होता, सरांकडे कदाचित दीड पावणे दोन वाजले असतील तरी थोडाही आळस जाणवत नव्हता. शेवटी भाऊसाहेब अनभुले यांनी राहिलेल्या आर्थिक विषयांवर प्रश्न विचारून शेवटी आभार मानले. सांभाषणाचे अंकरिंग बाबासाहेब पवार सर यांनी केले. सरांनी गावाकडील आंब्याच्या वासाची आठवण काढली आणि आता संध्याकाळी जेवणात आंबा खाताना सरांचे ते शब्द आठवले आणि पुन्हा ती चर्चा सुरू झाली.

खरंच एक डोळस उपक्रम किती वेगवेगळे अध्ययन अनुभव देऊन जातो हे प्रत्यक्ष अनुभवण्याची संधी आदरणीय बिनवडे साहेबांच्या कल्पकतेतून व आदरणीय कडूस साहेबांच्या व आदरणीय काळे साहेबांच्या नियोजनामुळे शक्य झाली. या उभयतांचे, आदरणीय बिनवडे साहेब, आदरणीय गोरे साहेबांचे व आमच्याशी संभाषण करणाऱ्या आदरणीय कार्ले साहेबांचे, प्रोत्साहन देऊन मार्गदर्शन करणारे जंजिरे साहेब, उज्वला गायकवाड मॅडम या सर्वांचे मनपूर्वक आभार. नेहमी संपर्कात राहण्याच्या गोड वायद्यावर आजचे संभाषण संपले आणि शेवटी एकच भाव उरला तो म्हणजे आश्वासक व कृतार्थ प्रारंभ!!!!

Ashutosh Pulate (Brahmani )- Mrs. Sulochana Purnale

जि. प.प्राथ.शाळा, ब्राह्मणी शाळेत  आज श्री . आशुतोष पुलाटे , टेक्सास, USA   यांचेशी VIDEO CONFERENCE यशस्वीपणे पूर्ण झाली.सदर V. C. साठी मा.जि. प.सदस्य, पं. स. सदस्य , मा.बी.डी. ओ. साहेब , विस्ताराधिकारी, केंद्रप्रमुख व गावातील इतर पदाधिकारी उपस्थित होते. भारतातील शिक्षण पद्धती व अमेरिकेतील शिक्षण पद्धती यावर सुंदर चर्चा झाली. सर्वांसाठी हा एक नवीन अनुभव होता. सर्व अधिकारी व पदाधिकारी यांनी या उपक्रमाचे कौतुक केले.

Haridas Bhogade, Sagar Berad, Umesh Sathe(Nimbodi) – Mr. Shishir Kathmore

आज जि. प. शाळा निंबोडी ता. नगर या शाळेत ग्लोबल क्लास अंतर्गत श्री.सागर बेरड (अमेरिका) श्री.हरिदास भोगाडे (अमेरिका)व श्री.उमेश साठे (कॅनडा)या तिघांशी तीन तास VIDEO CONFERENCE द्वारे(skype द्वारे  ) विविध विषयांवर चर्चा झाली.

या सर्वानी त्यांचे बालपण तसेच आरोग्य,स्वच्छता,शिक्षण यांचे महत्व सांगितले. या चर्चेमध्ये जि.प.अहमदनगर चे मुख्य कार्यकारी अधिकारी सन्माननीय श्री.रविंद्र बिनवडे साहेब यांनी स्वतः सहभाग घेऊन सर्व विद्यार्थी,शिक्षक व ग्रामस्थ या सर्वांना मार्गदर्शन केले.

            हा सर्व संवाद (video conference) जवळजवळ ३ तास इंटरनेटचा कोणताही अडथळा न येता पार पडला. मुलांना आपण अमेरिका येथील लोकांशी सहज बोलू शकतो याचे खुपच नवल वाटले .

  🌷🌷🌷 आज शाळेच्या पहिल्या दिवशी इ.१ली च्या विद्यार्थ्यांचे. जि. प. अहमदनगर चे मुख्य कार्यकारी अधिकारी सन्माननीय श्री.रविंद्र बिनवडे साहेब यांच्या हस्ते मोफत पाठ्यपुस्तक वाटप तसेच गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले.शाळेचे शैक्षणिक वातावरण पाहून साहेबांनी समाधान व्यक्त केले.

   या कार्यक्रमासाठी पंचायत समिती नगरचे गटशिक्षणाधिकारी श्री हराळ साहेब ,शा.पो.आ.अधिक्षक पंचायत समिती नगर कु.गलांडे मॅडम,टाळकी काझी केंद्राचे केंद्रप्रमुख भोर साहेब,श्री.सागर गाडे व सर्व ग्रामस्थ मुख्याध्यापक व सर्व शिक्षकवर्ग उपस्थित होते...🌸🌺🌻

Jagdish Deshmukh (Keshav Govind Ban Belapur )- Mr. Ashok Rahate

आज दिनांक 15/06/2017 जि.प.शाळा केशव गोविंद बन मध्ये प्रवेशोत्सव नव्हे तर मोठा आनंदोत्सव साजरा झाला.बालकाच्या जीवनातील अनेक स्थित्यंतरापैकी एक म्हणजे शाळा प्रवेश .शाळेत पाहिले पाहुल ठेवताना संमिश्र भावना मनात ठेवून मुलं शाळेत आलेली होती .पालकांनी मोठी स्वप्ने मनात  घेऊन शाळेत पाल्याना दाखल करण्याची लगबग केली.अशा भरगच्च कार्यक्रमात सर्व विद्यार्थ्यांना प्रेरणा देण्याचा  कार्यक्रम यंदा जि. प.अहमदनगरने योजिला त्यास सकारात्मक पणे साद दिली आपले आदर्श  ग्लोबल नगरीच्या धुरंदराणी .त्यातील मा. जगदीश देशमुखसर अभियंता कॅलिफोर्निया यांनी सकाळी 10 वाजता आमच्याशी हितगुज करण्यास सुरुवात केली त्यांची आपल्या माणसासाठी असणारी तळमळ  थक्क करणारी होती.सविस्तर चर्चा त्यांनी आमच्या शाळेतील सर्व विद्यार्थी ,शिक्षक,पालक प्रतिनिधींशी केली.मुलांच्या प्रश्नास कौतुकाने उत्तरे दिली .मा. बिनवडे साहेब,कडूस साहेब ,सूर्यवंशी साहेब आपणास खूप खूप धन्यवाद!                                           सर्व कॅलिफोर्निया गाढ झोपेत असताना  मा. जगदीश सर मोठ्या तळमळतेने विद्यार्थ्यांच्या उज्जवल भवितव्यासाठी आपला अमूल्यवेळ कामी लावत होते.आपले मनपूर्वक  आभार. पर मुलखात स्वकर्तुत्वाने  आपल्या पराक्रमाचा झेंडा रोवणाऱ्या या नगरी मावळ्यांना मानाचा मुजरा. अशा या गोड व्यक्तिमत्वांशी सवांद साधण्यास आम्ही सदैव आतुर असु.👈

Nandkumar Supekar(Hangewadi) – Mr. Chandrakant Raykar/Mr Gulab Sayyad

अहमदनगर जिल्हा परिषदेच्या वतीने आयोजित ग्लोबल नागरी उपक्रमाअंतर्गत हंगेवाडी ता श्रीगोंदा या शाळेत  मा. श्री नंदकुमार सुपेकर यांनी 12:50 ते 2 या वेळेत डोहा कतार येथून विद्यार्थ्यांशी मन मोकळेपणाने संवाद साधला. त्यांचे बालपण, शिक्षण या काळातील अनुभव सांगितले . कतार देशातील जीवन ,व्यवसाय व इतर सर्व प्रकारच्या गोष्टीतून त्यांनी कतार देशाचे एकप्रकारे आम्हाला दर्शन घडविले. नगर जिल्ह्याएवढा छोटा देश परुंतु सर्वात श्रीमंत देश हे ऐकल्यावर सर्वजण अचंबित झाली.आयुष्यात मोठे व्हायचे असेल तर अभ्यास करा, खूप खेळा, चांगल्या सवयी अंगी बाणा असा कानमंत्रही दिला. मुलांनी उत्स्फूर्तपणे विचारलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे मुलांना समजतील अशा सोप्या शब्दात दिली. व्हिडिओ व आवाजाची क्वालिटी उत्तम होती या प्रसंगी विस्तार अधिकारी श्री बोरुडे साहेब, मुख्या. श्री वैराळ सर,पालक व  शिक्षकांनी चर्चेत सहभाग घेतला . अतिशय सुंदर असा हा कार्यक्रम आयोजित झाला. शाळेत येण्याचे आमंत्रण सुपेकर साहेबांना देऊन एकमेकांचे ,ग्लोबल नगरी ग्रुपचे आभार मानून जड अंतकरणाने कार्यक्रमाची सांगता झाली. श्री नंदकुमार सुपेकर साहेब यांनी एक तासापेक्षीही जास्त वेळ आमच्या विद्यार्थ्यासाठी  दिला🙏🙏

Kalyan Ghule (Ramnagar )- Mrs. Rohini Sabale

आज दि. 15/6/2017 रोजी मा. CEO.श्री बिनवडेसाहेब व मा. प्राथ. शिक्षणाधिकारी श्री कडूससाहेब व अ.नगर विस्तार अधिकारी श्री काळेसाहेब व शेवगाव पंचायत समिती ग.शि.अ. मा. श्री बाळासाहेब बुगेसाहेब तसेचअ.नगर जि. प. टिमच्या सहकार्याने आज जि. प. प्रा. शाळा रामनगर, केंद्र..जोहरापूर, ता. शेवगाव, जि. अ.नगर या ठिकाणी USA न्यूयाॅर्कमधील मा. श्री कल्याण घुलेसाहेब यांच्याशी VC द्वारे संवाद साधला.

 

Kalyan Ghule (Ramnagar )- Mrs. Rohini Sabale

     यावेळी शेवगाव पं. समिती सभापती मा. श्री क्षितीजभैय्या  घुले पाटील, उपसभापती श्री शिवाजीराव नेमाने,   विस्तार अधिकारी मा. श्रीम. राऊळ मॅडम, नगरसेवक मा. श्री फलकेसाहेब, श्री भारस्कर व मा. युवानेते अजिंक्य लांडे पाटील, मुख्या. श्रीम. साबळेमॅडम सहशिक्षक श्रीम.जाधवमॅडम, श्री वाव्हळ सर, ग्रामस्थ, विद्यार्थी, तसेच ईनरव्हील क्लब शेवगावच्या डाॅ. लड्डा मॅडम डाॅ. राठी मॅडम, श्रीम. तडवलकर, वसुधाताई सावरकर, सबलोकताई, लांडेवस्ती शाळेच्या मुख्या. श्रीम.खुडेमॅडम, गणेशनगर शाळेतील श्रीम. बळीदमॅडम, कसबेमॅडम व mdm आॅपरेटर श्री कृष्णा मेहेत्रे सर उपस्थित होते.

उपस्थित मान्यवरांनी श्री कल्याण घुलेसाहेब यांच्याशी संवाद  साधला. मा. श्री कल्याण घुले यांनी विद्यार्थी व शिक्षकांशी विविध विषयावर चर्चा केली. यावेळी वातावरण अतिशय आनंदी व उत्साही होते. परिसरातील पालकांनी तेलगू भाषेतून संवाद साधला. या vcमुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण झाला. अतिशय प्रतिकूल परिस्थीतील विद्यार्थी व ग्रामस्थांना vc चा हा पहिलाच अनुभव होता. मा. श्री कल्याण घुले सरांशी गप्पा मारताना न्यूयाॅर्कमध्ये रात्रीचे 1-30 वाजले असताना देखील त्यांनी आपल्याला बहुमोल मार्गदर्शन केले. प्रतिकूल परिस्थीतीत असेच प्रेरणादायी काम करण्यासाठी मा. श्री घुलेसाहेबांनी शुभेच्छा दिल्या. ग्लोबल नगरीचे खुप खुप आभार.

Dr Sandip Tambe(Jamkhed)- Mr.Ravi Bhapkar

आज ग्लोबल नगरी या उपक्रमांतर्गत मुळचे  संगमनेर तालुक्यातील रहीवाशी व सध्या डेन्मार्क येथे स्थायिक झालेले प्रसिद्ध ह्रदय रोग तज्ञ डॉ. संदीप तांबे यांनी जि.प.प्राथ.शाळा जामखेड येथील मुलांशी जवळ जवळ 2 तास संवाद साधला.

     यादरम्यान मुलांनी विचारलेल्या विविध प्रश्नांची समर्पक उत्तरे त्यांनी दिली तसेच मुलांना यशस्वी होण्याच्या टिप्स व उत्तम आरोग्यच्या टिप्स ही दिल्या. मी कसा घडलो याबाबत ही मनमोकळा संवाद साधला.तब्बल 2 तास बोलल्यानंतर ही त्यांचा उत्साह पाहन्यासारखा होता.येत्या डिसेंबर महिन्यात आल्यावर शाळेला प्रत्यक्ष भेट देवून मुलांशी संवाद साधन्याचा मनोदय त्यांनी व्यक्त केला.यावेळी पंचायत समिती सभापती श्री सुभाष आव्हाड साहेब , गटशिक्षणाधिकारी पोपटराव काळे, पत्रकार अशोक निमोणकर , प्रकाश खंडागळे व शाळेतील शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.

     अशा प्रकारचा प्रेरणादायी कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी श्री रविंद्र बिनवडे साहेब, ग्लोबल नगरी चे अमेरिकेतील संयोजक श्री किशोरजी गोरे, शिक्षणाधिकारी श्री अशोक कडूस साहेब , उपशिक्षणाधिकारी पोपटराव काळे साहेब यांचे खुप खुप आभार...!!

Shubhangi Tambe- Vikhe (Dorhale)- Mr. Baba Kharat

आज दि.15/06/2017 रोजी सकाळी 11 वाजता श्रीमती. शुभांगी तांबे(विखे) यांनी टोरँटो(कॅनडा) येथून जि. प.प्राथ.शाळा डो-हाळे. ता.राहाता येथील विद्यार्थी, पालक व शिक्षक यांच्याशी संवाद साधला.त्यांनी आपल्या शैक्षणिक प्रवासाबद्दल सविस्तर माहिती सांगितली.तसेच कॅनडा येथील शिक्षण पध्द्ती,इंग्रजी भाषेचे जीवनातील महत्व,सहशालेय उपक्रमातील विद्यार्थी सहभागाचे महत्व,योगासने,सार्वजनिक स्वच्छता,स्वयंशिस्त याबाबींविषयी सविस्तर चर्चा केली.भारत व कॅनडा येथील हवामानातील फरक याबद्दल सविस्तर माहिती सांगितली.

डो-हाळे शाळेतील विद्यार्थिनी कु.डांगे श्रद्धा हिने त्यांच्याशी इंग्रजीत संवाद साधला.शाळा व्यवस्थापन समिती सदस्य श्री.भाऊसाहेब डांगेयांनी शाळेतील विविध उपक्रमांची माहिती श्रीम.शुभांगी तांबे(विखे) यांना दिली.जिल्हा परिषदांच्या शाळांमधील सकारात्मक बदला बाबत त्यांनी आनंद व्यक्त केला.त्यांच्याशी संवाद साधल्यामुळे विद्यार्थी,पालक व शिक्षक याच्या ज्ञानात भर पडली व सर्वजण आनंदी झाले.आम्हाला हि सुवर्णसंधी उपलब्ध करून दिल्याबद्दल जि. प.प्रशासन व ग्लोबल नगरी परिवाराचे मन:पूर्वक आभार🙏🙏🙏

 

Rahul Kadu(Devi Bhoire)- Mr.Sanjay Darekar

जि.प. प्राथ . सेमी इंग्रजी डिजिटल स्कूल देवीभोयरे ,ता .पारनेर या ठिकाणावरून अमेरिकेत रहिवाशी असणारे राहूल कडू  यांच्याशी ऑनलाईन संवाद न अडखळता साधला. सरांनी अतिशय ओघवत्या भाषेत, सोप्या शब्दांत मुलांशी, तसेच गावच्या सरपंच सौ. सुजाता ताई गाजरे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री. जयवंतराव मुळे, उपसरपंच श्री. विकास सावंत, ग्रामस्थ व पालक यांच्याशी संवाद साधला. शाळा पाहून आनंद व्यक्त केला.विदयार्थ्यांच्या विविध प्रश्नांची उत्तरे दिली. विद्यार्थ्यांना त्यांना भेटून खूप आनंद झाला. खूप खूप धन्यवाद राहूल सर🙏🙏

Abhijit Hoshing(Dorhale)- Mr. Ashok Pandit

📡📡आज अमेरिकेत मा.अभिजित हौशिंग सरांबरोबर शाळेतील मुले,ग्रामस्थ,यांचा संवाद झाला.खूपच प्रेरणादायी अनुभव होता यावेळी हौशिंग सरांनी मुलांशी खूपच छान अनुभव शेअर केले यावेळी त्यांनी पर्यावरण ,स्वच्छता ,देशप्रेम,वृक्षारोपण याविषयावर खूपच छान विचार मांडले मुलांना समजावून सांगितले.

स्वतः जवळच्या अनेक क्लीप त्यांनी दाखवल्या त्यांची पत्नी यादेखील डाक्टर असून  त्यांनीही मुलांना त्यांच्या स्वतः च्या मुलांचे पुस्तके ,वह्या दाखवल्या अनेक छान छान अशा शब्दाने मुलांमध्ये आत्मविश्वास निर्माण केला.

एकूणच मुलांना ग्रामस्थ खूपच प्रेरणादायी अनुभव ठरला.एक तासाच्या संपूर्ण कालावधित इंटरनेट खूपच छान चालले मध्ये कोणताही अडथळा आला नाही.

Dr. Satish Nimse(Khamgaon)- Kirti Palve

आज दि.१५/६/२०१७ रोजी खामगाव शाळेत "ग्लोबल" संवाद south Korea येथील श्री.सतीश  निमसे यांच्याशी संवाद साधला.खूप अनमोल असे मार्गदर्शन लाभले.या कार्यक्रमासाठी  जि.प.अहमदनगर शिक्षण समिती अध्यक्षा मा.सौ.राजश्रीताई घुले पा.,जि,प.सदस्य श्री.साळवे सर पं.समिती सदस्य मा.सौ.मिराताई लांडे पा.शिक्षण अधिकारी  मा.श्री.कडूस साहेब ,गटशिक्षणाधिकारी मा.श्री.बुगे साहेब खामगाव गावचे सरपंच ,शा.व्य.स.अध्यक्ष ,उपस्थित होते.श्री.सतीश निमसे सर यांनी सकाळी १०ते ११ या वेळेत  पर्यावरण ,शिक्षणपद्धती यावर खूप छान मार्गदर्शन केले.मी तुमच्यातीलच एक आहे अशा पद्धतीने सरांनी चर्चा केली.ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना हा नवीन अनुभव होता.नेट कनेक्टिव्हिटी उत्तम होती.मुलांनी छान संवाद साधला.पहिलीच वेळ होती मुले खूप आनंदी झाली.यानंतर पाठ्यपुस्तक वाटप व वृक्षारोपण कार्यक्रमही उपस्थितांच्या हस्ते पार पडला.मा.श्री.बिनवडे साहेबांचा हा उपक्रम खरोखरच खूपच उल्लेखनीय आहे.

Kishore Gore(Hivare Bazar)- Bhausaheb Thanage

आज शाळेच्या पहिल्याच दिवशी सकाळी 10.30 वाजता न्युजर्सी अमेरिका येथून मा.किशोरजी गोरे यांच्याशी हिवरे बाजार प्राथमिक शाळेतील विद्यार्थी ,सरपंच मा.पोपटराव पवार ,शाळा व्यवस्थापन समिती सदस्य यांसह पालकांनी video कॉन्फरन्स द्वारे संवाद केला.10.30ते 12.30असा 2 तास विविध विषयांवर चर्चा मार्गदर्शन प्रश्नोत्तरे झाली.

यात अमेरिका व भारतातील शाळा ,विद्यार्थी,पर्यावरण,शिस्त,जीवन कौशल्ये,शाळेत पालकांचा सहभाग, राहणीमान यांसह विविध बाबतीत असणारे साम्य व फरक विद्यार्थ्यांना समजले नवनवीन गोष्टींचा परिचय झाला.गोरेसाहेबांनी कौटुंबिक बाबींसह सर्व बाबींना उजाळा देऊन विद्यार्थ्यांना मी तुमच्यातीलच एक असल्याची जाणीव करून दिली .विद्यार्थ्यांनी स्वरचित कविता एकविल्या व साहेबानी टाळ्या वाजवून प्रतिसाद दिला.

 

Kishore Gore(Hivare Bazar)- Bhausaheb Thanage

 

हिवरेबाजारला ग्लोबल हाऊस मध्ये येण्याचे निमंत्रण विद्यार्थ्यांनी दिले तर अमेरिकेला येण्याचे निमंत्रण गोरेसाहेबांनी दिले.पोपटराव पवार यांसारखे आदर्श व्यक्तिमत्व आपल्या समोर असल्यामुळे हिवरे बाजारच्या शाळेतील विद्यार्थी भाग्यवान असल्याचे त्यांनी सांगून महिन्यातून एकदा विद्यार्थ्यांशी ग्रामस्थांशी  निरनिराळ्या विषयावर संवाद करण्याची इच्छा व्यक्त केली.

मुख्यकार्यकारी अधिकारी मान. रवींद्र बिनवडेसाहेब,शिक्षणाधिकारी कडूससाहेब यांच्यामुळेच आज पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना अमेरिकेची सहल करता आल्याचे पोपटराव पवार यांनी सांगून आभार मानले.

Nita Bhalke(Samvatsar)- Pravin Aher

जि. प. प्रा. शाळा संवत्सर येथे नीता भालके मॅडम London Uk यांनी हितगुज केले. यावेळी कार्यक्रमासाठी संवत्सर गावातील पंचायत समिती सदस्या योगीताताई पवार  , सरपंच सौ शोभा ताई निकम , उपसरपंच श्री विवेक कृष्णराव परजणे पा , सर्व ग्रामपंचायत सदस्य , पालक तसेच शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष व सर्व सदस्य विद्यार्थी तसेच पंचायत समिती कोपरगाव च्या गटशिक्षणाधिकारी श्रीम शबाना शेख मॅडम उपस्थित होते.  संपूर्ण कार्यक्रमात नीता मॅडम यांनी अतिशय सोप्या शब्दात मुलांशी गप्पा मारल्या. महिला पालकांना ही यावेळी skype वर मॅडम शी बोलण्याचा मोह आवरला नाही . मुलांच्या सर्व प्रश्नांचे उत्तरे देताना जवळ पास १ तास ३०मिनिटांचे संभाषण झाले. मुलांनी मॅडम कडून शाळेवर येण्याचे प्रॉमिस घेतले. या सर्व अविस्मरणीय अनुभवांसाठी ग्लोबल नगरी टीम चे अतिशय आभार 🙏🏻🙏🏻😀😃