GlobalNagari Smoky Mountain Meet July 2018

“ग्लोबलनगरी परिवाराचे” स्नेह-संमेलन व्हावे,” हि श्री.किशोरदादा गोरे यांची खुप दिवसांची इच्छा होती. किशोरदादांना मी व श्री. संजय अहिरे यांनी दुजोरा दिला आणि या स्नेह-संमेलनाच्या ठिकाणाची चर्चा सुरु झाली. बऱ्याच ठिकाणांबद्दल चर्चा झाली आणि शेवटी “स्मोकी माउंटन” या टेनेसी राज्यातील अतिशय निसर्गरम्य ठिकाणाची ३० जून २०१८ ते ३ जुलै २०१८ या ४ दिवसासाठी निवड झाली.

श्री.शिंदेसाहेब व सौ.शिंदेकाकू(श्रीरामपूर), श्री.किशोरदादा व सौ.अंजलीताई गोरे, मम्मी (सरोजताई घोरपडे)(न्यूजर्सी), श्री.संजीवदादा व सौ.कीर्तिताई देशमुख(पेनसिल्व्हेनिया), श्री. सुरेशदादा व सौ.मेघराणीताई ठुबे(न्यूजर्सी), श्री. अभयदादा व सौ.अमलाताई आहेर आणि शौना व यशोधन(न्यूजर्सी), श्री.अशोकदादा व सौ.स्नेहाताई माळी आणि त्यांची कन्या नेहा(ओहिओ), श्री.संजयदादा व सौ.अनुराधाताई भगतआणि त्यांची कन्या कु. मैत्रेयी(मिसूरी), श्री.महेशदादा व सौ.पूनमताई सासवडे आणि त्यांची मुले कु.शौनक व कु. ऋषील(शिकागो), श्री.बापू व सौ.रश्मी हिरवे आणि त्यांची कन्या कु.उर्वी(शिकागो), श्री.नितीन व सौ.अंजली बोठे आणि कु.शाम्भवी(शिकागो), श्री.प्रशांत व सौ.सुरेखा जपकर आणि कु. नाईसा(शिकागो), श्री.अविनाश व सौ.सविता मेहेत्रे आणि त्यांची कन्या कु.सिमरन व आयुषी(ओहिओ), श्री.संजय अहिरे व कु.अद्वैत(मिशीगन), श्री.सचिन व सौ. हेमलता शिंदे आणि कु.अक्षता व कु.शौर्य (मिशीगन), श्री.विराज शेळके(मिशीगन), श्री.इंद्रजीत व सौ.शीतल कोहोक आणि कु.मिश्का (केंटुकी), श्री. निलेश व सौ.संगीता इंगुळकर आणि कु.नीलिका व छोटू सदस्य(केंटुकी), श्री.अमित व सौ.प्राची बनकर पाटील(टेक्सास), श्री.श्रीकांत व सौ.स्वाती जाधव(नॉर्थ कॅरोलिना), श्री.विलास व सौ.वर्षा घोलप(न्यूजर्सी), श्री.प्रचित साळुंके(मिशीगन) आणि श्री.उमेश व सौ.सुजाता पवार आणि कु.दीक्षा आणि कु.सई(ओहिओ)
पाहता पाहता या सर्व मंडळींनी स्नेह-संमेलनाचे आमंत्रण मान्य केले.

अगदी लग्नघरासारखी लगबग चालू झाली. सर्व परिवाराचे कॉन्फरेन्स कॉल वर स्मोकितील फिरण्याची ठिकाणे, जेवणाची आणि प्रवासाची तयारी या सर्वांचे नियोजन सुरु झाले. तसं बरेच परिवार हे पहिल्यांदाच भेटणार होते तरी देखील एका गोष्टीची मात्र सर्वांनाच ओढ होती ती म्हणजे “किशोरदादांना” आणि “ग्लोबलनगरी” परिवारातील इतर परिवारांना भेटण्याची इच्छा.
किशोरदादा हे सर्वांनाच जोडणारा दुवा होते.

सर्व ग्लोबलनगरी परिवार ३० जून ला संध्याकाळ पर्यंत “ऍक्वा ड्रीम’इन रिट्रीट” केबिनला पोहोचले. सौ.सुजाता पवार यांनी बनवलेल्या खमंग भडंग आणि सर्वांनी मिळून बनवलेल्या चहाने सर्वांचे स्वागत झाले.
सौ.शीतल कोहोक यांनी व्हेज ग्रिल्लिंग व श्री. अविनाश मेहेत्रे यांनी मसाला लावलेले “अपना बाजार”चे तयार चिकन व सौ. सविता मेहेत्रे यांनी श्रिम्प ग्रिल्लिंग आणले होते. परिवारातील सर्व सदस्यांनी जमेल तसा हातभार लावत यथेच्छ व्हेज व नॉन-व्हेज ग्रिल्लिंग केले. विराजने “द्रोण” च्या साहाय्याने सुंदर विडिओ शूटिंग केले.
इकडे केबिनच्या आत मध्ये नगरी पद्धतीचे “पिठलं” आणि भात सर्वांनी मिळून किशोरदादांच्या पद्धतीने बनवलं. स्वतः सौ.शिंदे काकू, मम्मी, मेघराणीताई,अंजलीताई, अमलाताई, स्नेहाताई, सुजाता, सविता व सर्व महिला मंडळीनि स्वयंपाकाला सुंदर सुरुवात केली. रात्रीचे जेवण झाले आणि मग एक-एका परिवाराने पुढे येऊन स्वतःची ओळख करून दिली. गप्पा मारत हसत खेळत ओळख करून घेत रात्र कशी झाली काहीच कळलं नाही. सौ.संगीताताई इंगुळकर आणि सौ.अमलाताई आहेर यांनी मराठमोळ्या परंपरा राखत सर्व सुवासिनींचा हळदी-कुंकवाचा कार्यक्रम केला. सौ.प्राची बनकर आणि सौ.स्वाती जाधव यांनी छोट्या मुलांच्या हातावर मेहेंदीकाढून त्याच्या चेहेऱ्यावरचे हसू द्विगुणित केले तर महिला मंडळाने अंताक्षरीचा मनमुराद आस्वाद घेतला.
दुसऱ्या दिवशी सकाळी ५ वाजता स्मोकी माउंटन मध्ये सुंदर ट्रेल्सचे आयोजन झाले आणि निसर्गरम्य “स्मोकी माउंटन”चे दर्शन झाले.
प्रत्येक जण आपापल्यापरीने त्याचा आस्वाद घेत होता. पुन्हा केबिन मध्ये परतून नाश्ता आणि मग चहा घेत दिवसभराचे फिरण्याचे नियोजन झाले आणि सर्वांनी “क्लिंगमन’स डोम” चा मार्ग धरला. निसर्गाने मनमुराद द्यावे आणि आपण घेत राहावे, याचा प्रत्यय तिथे उंचावर पोहोचल्यावर आला. भराभर सर्वांनी ती दृश्य टिपले. काहींनी नजरेत सामावण्याचा तर काहींनी हृदयात साठवण्याचा तोकडा प्रयत्नही केला. निसर्गाच्या जेवढ्या सानिध्ध्यात जाऊ, तितका तो आणखी नयनरम्य होत जातो. मन खुलत आणि फुलत जाते, तसंच काहीसं सर्वांचं झालं.
नंतर “चेरोकी” ला म्युसिअम पाहिल्यावर कळले कि २५० वर्षांपूर्वी इथे लोकजीवन कशा पद्धतीने जगले गेले आणि निसर्गाशी संवाद साधत कसे जीवनमान उंचावत गेले. त्या काळातील यंत्र आणि तांत्रिक प्रगतीचे दर्शनच झाले.
रात्री केबिन मध्ये जेवणाचा आस्वाद घेत “कवी संमेलन” पार पडले. त्यात श्री.निलेश इंगुळकरांचे दिलखुलास काव्य तर श्री.बापू हिरवे यांनी परदेशात गेल्यानंतर माणसाच्या मनाचा घेतलेला ठाव गद्य आणि पद्य स्वरूपात ऐकवला. तसेच आदरणीय डॉक्टर बाबा साहेब आमटे यांच्या “आनंदवनातील” विद्यार्थी दशेत असतानाचे मनाला भिडलेले अनुभव कथन केले.
श्री.उमेश पवार यांनी “अबोल निसर्गाची” भाषा व “पावसातली ती” हे काव्यातून ऐकवलं आणि शेरो शायरी करत थोडं हसत खेळत वातावरण हलकं-फुलकं केलं.

छोट्या कलाकारांनीही म्हणजेच अक्षता व शाम्भवी यांनी खूप छान गाणी म्हणून सर्वांचे मनोरंजन केले.छोट्या मुलांनी मस्तपैकी स्विमिन्ग पूल मध्ये डुंबण्याचा आनंद घेतला.तिसऱ्या दिवशी “लॉरेल फॉल” हा निसर्गरम्य धबधबा पाहून मन हर्षोल्हासित झालं. आणि मग “गॅटलिनबर्ग” च्या मध्यवस्तीतील “ऐरिअल ट्राम”, मिरर मेझ, रॅपलिंग, आईस बमर कार आणि आणखी बरेचशे जवळ पास ची आकर्षणं पाहिली आणि मज्जा केली.

रात्री सौ.शीतल कोहोक यांनी नियोजन केलेले गेम्स सर्व परिवाराने एकत्रितपणे खेळून मनमुराद आनंद लुटला. ह्या गेम्समुळे मुले, नवरा-बायको, महिला मंडळ आणि पुरुष मंडळी सर्व परिवार आपसूकपणे जवळ आले. श्री.अविनाश मेहेत्रे, सौ.मेघराणीताई ठुबे, सौ.सुजाता पवार व शौना आहेर, प्रचित साळुंके, अद्वैत अहिरे यांनी गेम्स ला मदत केली. मनाशी मनाचं एक घट्ट नाते तयार झाले. श्री. इंद्रजीत व सौ. शीतल कोहोक यांचे मनापासून धन्यवाद सर्व काही विसरून खळाळून हसवता हसवता एकोपा दृढ केल्याबद्दल!

रात्र संपून दिवस कधी सुरु झाला, काही कळलंच नाही. चौथ्या दिवशी बॅग भरण्याची सर्वांची घाई सुरु झाली. नितीन बोठे, बापू हिरवे
आणि महेश सासवडे यांनी सकाळच्या ट्रेलची एवढी सवय लावली कि वाटत होतं, एक जवळचा निदान छोटासा तरी ट्रेल करून जावा. पण परतीचा प्रवास मोठा होता आणि १० वाजता चेक आऊट करणे गरजेचे होते.

किशोरदादांनी सर्व परिवारातील सदस्यांचे आभार मानले आणि जड अंतःकरणाने सर्व परिवार पुढच्या वर्षी पुन्हा नक्की भेटूया हि ग्वाही देऊन साश्रू नयनांनी परतीच्या प्रवासाला सज्ज झाले. “ग्लोबलनगरी परिवाराचं एकमेकांशी घट्ट नातं तयार होणं.”हाच किशोरदादांचा उद्देश होता आणि तो “स्मोकी माउंटन” मधील स्नेह-संमेलनाने सफल झाला.

रात्री अशोकदादा माळी यांनी घरी पोहोचल्यावर व्हाट्सअप ग्रुपवर मनापासून व्यक्त केलेल्या व सर्व ग्लोबलनगरी परिवारातील सदस्यांच्या भावनांनी कुमार गंधर्व व वाणी जयराम यांनी गीतकार बाळ कोल्हटकरांच्या “ऋणानुबंधाच्या जिथून पडल्या गाठी, भेटीत तृप्तता मोठी” अजरामर केलेल्या ओळी आठवल्या. अगदी त्याच भावनेने ग्लोबलनगरी परिवाराच्या ऋणानुबंधाच्या “स्मोकित” पडलेल्या गाठींनी घडविलेली हि अविस्मरणीय भेट खूप मोठी तृप्तता देऊन गेली.

चला तर ग्लोबलनगरी मंडळी, भेटूयात…पुढच्या वर्षी याच जोमाने आणि उत्साहाने.