हर्रीकेन हारवी आणि इर्मा-एक निसर्ग तांडव

ग्लोबलनगरी परिवारातील अनेक परिवार ह्या वादळांना समर्थपणे तोंड देऊन सुखरूप आहेत, ह्याचा आनंद झाला.

“हर्रीकेन हारवी” ह्यूस्टन, टेक्सास व “हर्रीकेन इर्मा” फ्लोरीडाला आलेली भयंकर वादळं म्हणजे निसर्गाने मांडलेला तांडव व रौद्र रूप.

निसर्गाचा घाव सोसताना…….त्याचे तांडव पाहताना मनातून अगदी सहजरित्या देवाचा धावा सुरु होतो.

काही क्षण असा वाटतं कि आता सगळं सगळं संपलं.

कदाचित आपल्या पूर्व पुण्याईने त्याची तीव्रता आपल्यापर्यंत पोहोचत अन जाणवत नसावी. अशा वेळी आपल्या आप्तेष्ठ, हितचिंतक, मित्र व मैत्रिणींचे धीराचे अन काळजीचे स्वर कानावर येतात. आणि त्या कातरवेळीही खूपशी हिंमत देऊन जातात. एक आशेचा किरण यावा तसा अनेकांच्या प्रार्थनांमधून निसर्गाला शांत होण्याचे अनामिक आवाहन केले जाते.

मनात असंख्य चांगले वाईट विचार येतात.

आजूबाजूला राहणाऱ्या मित्रांची, शेजाऱ्यांची हुरहूर वाटायला लागते. आपल्याबरोबरच आपसूक त्यांचीही काळजी घेतली जाते.

अनंत मदतीचे हात पुढे सरसावतात आणि ह्या माणुसकीच्या मजबूत साखळीने निसर्गाला साकडं घालतात कि,

“हे निसर्गा, जसा तू सर्व शक्ती एकवटून आमच्यातल्या माणुसकीची परीक्षा पाहतोस, तसाच आम्हीहि एकवटून माणुसकीच्या शक्तीचे दर्शन घडवतो आहोत.”

गहिवरलेले मन ह्याच सामाजिक जाणिवेतून अनेक उपक्रम राबवण्यासाठी भरारी घेते पुन्हा नव्या उभारीने…घर पुनर्रउभारणीसाठी अन समाज सुधारणेसाठी.

निसर्गाचे हे रौद्र रूप कदाचित आपल्यातल्या माणसाला खडबडून जागे करून त्या शाश्वत अन अनंत आदिशक्तीची आठवण करून देत असावं…नाही का?

आपलाच,
उमेश पवार
मेरिसविल्ले, ओहिओ